आळंदीत महात्मा गांधी यांच्या रक्षा विसर्जन स्तंभास धोका   

तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून सांडपाणी वाहिनीसाठी दगडी घाटाची तोडफोड

पुणे : आळंदीत इंद्रायणी नदीवर बांधण्यात आलेल्या दगडी घाटाचे सांडपाणी वाहिनीसाठी जेसीबीच्या मदतीने खोदकाम सुरू आहे. आळंदी शहरातील सांडपाणी बंदिस्त नाल्यातून नेण्यासाठी सुरू असलेल्या या कामामुळे पावसाळ्यात संपूर्ण घाटास धोका निर्माण होऊ शकतो. तसेच येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या रक्षा विसर्जन स्तंभासही धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी प्रशासनाने हे कार्य थांबवून योग्य नियोजन करावे, अशी मागणी येथील ग्रामस्थ व वारकर्‍यांनी केली.
 
माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूह, श्रीक्षेत्र आळंदी देहू परिसर विकास समिती आणि विश्वशांती केंद्र आळंदी यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीक्षेत्र आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या दोन्ही तीरावर करोडो रुपये खर्चून नियोजन बद्ध दगडी घाट बांधण्यात आले आहे. या घाटाखालून सांडपाणी वाहून जाण्याकरिता स्वतंत्र भूमिगत गटाराचे नदीपात्राच्याकडेने बांधकाम करण्यात आले. असे असतांना संस्था किंवा संस्थेचे अधिकारी यांच्याशी चर्चा न करता रात्रीच्या वेळी या घाटाजवळ जेसीबी मशीनने तोडफोड व खोदकाम करण्यात आले.तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून सांडपाणी वाहिनीचे काम सुरू आहे. 
 
माईर्स एमआयटीचे संचालक डॉ. महेश थोरवे म्हणाले, संस्थेने ज्या पद्धतीने दगडी घाटाचे बांधकाम केले आहे तसे पूर्ववत न झाल्यास पावसाळ्यात महापूराच्या स्थितीमध्ये संपूर्ण घाटास धोका होऊ शकतो. यामुळे घाट खचून जीवितहानी होण्याची भिती आहे. तसेच या ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या रक्षा विर्सजन स्तंभास धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे हे खोदकाम थांबवून पर्यायी मार्ग काढावा.

Related Articles